Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Free access under RTE : पालकांनो, आरटीईअंतर्गत मोफत प्रवेश, कागदपत्रे ते ऑनलाईन अर्ज… वाचा एका क्लिकवर

0

Free access under RTE : आरटीईअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण पालकांना मोफत प्रवेशासाठी अर्ज भरण्यास आणखी संधी उपलब्ध व्हावी यासाठी शिक्षण विभागाने येत्या 25 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

आरटीईअंतर्गत वंचित घटक आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के जागांवर मोफत प्रवेश मिळतो. वंचित घटकांत अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, दिव्यांग, अनाथ, एचआयव्हीग्रस्त, तसेच कोविड प्रभावित बालकांना समावेश होतो. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही अट नाही. केवळ जातीच्या दाखल्यावर प्रवेश अर्ज करता येतो. दुर्बल घटकांसाठी मात्र तहसीलदारांचा एक लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला लागतो.

अजूनही अनेक पालकांनी अर्ज भरलेले नाहीत. कारण ऑनलाईन अर्ज भरताना संकेतस्थळावर येणाऱ्या अडचणी, तसेच आवश्यक कागदपत्रे मिळविण्यात वेळ लागत असल्याने अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी पालकांमधून होत होती. त्याची दखल घेत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने अर्ज भरण्यात 25 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान या मुदतीत पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज भरून द्यावेत. यापुढे मुदतवाढ मिळणार नाही, असेही शिक्षक संचालकांनी पत्रात म्हटले आहे.

प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे : निवासी पुरावा ( रेशन कार्ड, वाहन परवाना, वीज बिल, टेलिफोन बिल, घरपट्टी, आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी एक, निवासी व्यवस्था नसल्यास भाडेकरार), जन्म दाखला, उत्पन्नाचा दाखला ( एक लाखाच्या आत), जातीचे प्रमाणपत्र

प्रवेशासाठी अर्ज कसा करायचा? : ऑनलाईन अर्जासाठी https://student.maharashtra.gov.in या शासकीय संकेतस्थळावर जा. येथे आरटीई 25टक्के पोर्टलवर क्लिक करा. नंतर ऑनलाईन अ‍ॅप्लीकेशनवर क्लिक करून अर्ज भरा. अर्ज अचूक भरण्यासाठी नोंदणी केलेल्या सर्व 364 शाळांमध्ये शिक्षण विभागाने मदत केंद्र सुरू केले आहे. या ठिकाणी तुम्हाला मोफत अर्ज भरून मिळणार आहे. त्यामुळे पालकांनी तेथूनच अर्ज भरावा, काही अडचण असेल तर मनपा किंवा जि. प. शिक्षण विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.