Mission 10th Exam : उद्यापासून दहावीची परीक्षा सुरु होत आहे त्यामुळे या परीक्षेचे दडपण विद्यार्थ्यांसोबत पालकांना पण असतेच. परंतु आता पूर्वीइतके ह्या परीक्षेचे अवडंबर राहिले नाही इतकेच. आयुष्य बदलवून टाकणारी परीक्षा, जीवनाला खरी कलाटणी मिळणारी परीक्षा, जीवनाचे ध्येय निश्चित करणारी परीक्षा…. खरंतर अश्या नानाविध वाक्यांनी घेरलेलीअशी ही परीक्षा. पूर्वी बोर्डाची परीक्षा असल्याने असलेले दडपण आता केवळ शालेय जीवनातली एक परीक्षा इथपुरतेच मर्यादित राहिले आहे.

जरी पुढली दिशा ठरवण्यासाठी ह्या परीक्षेचे महत्व असले तरी आता करियर वगैरे गोष्टींसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने आणि विशिष्ठ शिक्षणानेच करियर होते हा भ्रम तुटल्याने दहावीची परीक्षा हा केवळ शालेय शिक्षणाचा एक टप्पा इतकेच बनून राहिला आहे. येत्या आठ दिवसात आपल्या आसपास दहावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊयात. त्यांच्या मनातली भीती कमी होईल असा प्रयत्न करूयात. हीच पुढली पिढी सकारात्मकतेने परीक्षेला सामोरी जाईल असे पाहुयात. तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची… हा विश्वास परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना देऊयात.
टेन्शन को मारो गोली…
टेन्शन घेतल्याने झालेला अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. दिवसाचे नियोजन करा. प्रत्येक दोन तासांनी 15 मिनिटे ब्रेक घेऊन चेहरा थंड पाण्याने धुवा. अंग ताणून मोकळे करा. डोळे बंद करून 5 मिनिटे दीर्घ श्वसन करा. एखादी आवळा सुपारी किंवा चॉकलेट तोंडात टाका आणि 15 मिनिटे झाले की पुन्हा लगेच अभ्यासाला बसा. दिवसभरात असे नियोजन केले तर अभ्यासातले कॉन्सन्ट्रेशन वाढायला मदत होईल आणि कंटाळवाणा अभ्यास झटकन पूर्ण होईल. आणि हो… सकाळच्या कोवळ्या उन्हात रोज किमान 10 मिनिटे जरूर बसा. छोटी परीक्षा आहे फक्त… थोडा जोर लावूयात… अटकेपार झेंडे फडकवूयात.
शेवटच्या आठवड्यात नेमकं काय करावं…?
परीक्षेची तयारी पूर्ण झाली असेलच. पण आता शेवटच्या आठवड्यात नेमकं काय करावं…? मुळातच ह्या परीक्षेचे दडपण विद्यार्थ्यांवर असतेच पण सोबतच कुटुंबाने, समाजाने देखील ह्याची धास्ती घेतलेली दिसते. अनेक घरात आमच्याकडे दहावी आहे यंदा अशी वाक्य ऐकायला येतात. अख्खे कुटुंबच जसे काय परीक्षेला बसले आहे असे दिसते. गंमत म्हणजे अनेक जणांना जर आज विचारलं तर सांगतील की उगाचच भीती वाटलेली SSC परीक्षेची. तर दहावीतल्या दोस्तांनो … टेन्शन लेनेका नै… शेवटल्या आठवड्यात आपली तब्येत नीट राहील ह्याकडे लक्ष द्या.
रोज किमान 7 ते 8 तास एकसलग छान झोप घ्या. चटकदार, तेलकट अश्या गोष्टी खाणे टाळा. रोज सकाळी नाश्त्यासोबत रात्रभर भिजवलेले 3-4 बदाम आणि काळ्या मनुका खा. चहा कॉफी पिण्याचे प्रमाण कमी ठेवा. घरचेच खाद्यपदार्थ खा. रोजच्या रुटीनमध्ये 10 मिनिटे एकाजागी डोळे मिटून शांत बसून ध्यान करा. बाकी जो अभ्यास झाला आहे तो नीट आठवून बघा. ऐनवेळी टेन्शन घेतलं तर जे येतंय ते विसरले असे नको व्हायला. काळजी घ्या, आनंदी रहा.
हे वाचा: अंगणवाडीत 20 हजार महिलांना नोकरीची संधी, वाचा सविस्तर…
दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये पॉझीटीव्हिटी निर्माण करूयात…
आमच्याकाळी नव्हती बुआ अशी दहावी…. आमच्याकाळी अमुक असायचं वगैरे वगैरे वाक्य आधीची प्रत्येक पिढी यंदा दहावी असलेल्याला ऐकवते. ह्यामुळे काय होतं तर जो दहावीला आहे त्याचे टेन्शन नक्कीच वाढते. यंदा दहावीला असणाऱ्या आपल्या आसपासच्या छोट्या मित्रमैत्रिणींना शुभेच्छा देताना त्यांचं मनोबल वाढवूयात. दहावीच्या मित्रमैत्रिणींना अभ्यास लक्षात राहावा ह्यासाठी तुमच्याकडे काही टिप्स असतील तर जरूर द्याव्यात. प्रोत्साहन हे संसर्गजन्य असते. एकाला दिले की ते पसरत जाते. सकारात्मक वातावरण त्या विद्यार्थ्यांच्या आसपास राहील ह्याची काळजी घेऊयात. त्यांच्या पालकांचे पण टेन्शन कमी करायला मदत केली पाहिजे. अनेकदा मुलांपेक्षा पालकांचाच ताण वाढलेला असतो. मुलांना पुढे काय करणार असे प्रश्न मात्र ह्याकाळात विचारू नयेत. मुळात जास्त गप्पा मारून त्यांचा वेळ पण घेऊ नये. ताण कमी राहील ह्यासाठी मुलांनी काय करावे ह्याची माहिती असल्यास पालकांना द्यावी. पॉझीटीव्हिटी निर्माण करूयात, परीक्षार्थी मित्रमैत्रिणींना बळ देऊयात.
याकाळात शारीरिक व मानसिक आरोग्य कसे राखावे?
दोस्तहो शेवटच्या तीन दिवसात काय कराल..? अभ्यासाचे नियोजन तर असेलच, पण मन मेंदू मनगट रिलॅक्स ठेवावं. चिडचिड होणार नाही किंवा नकारात्मक भाव निर्माण होतील अश्या गोष्टींपासून दूर रहा. पेपरवाचन, टीव्हीवरील बातम्या शक्यतो टाळा. अगदीच क्रिकेटची मॅच, गाणी वगैरे रिलॅक्स फील देणाऱ्या गोष्टी थोड्यावेळ पाहायला हरकत नाहीच. खान्यातले पदार्थ तिखट जाळ नसावेत. पॉट शांत राहील असे पदार्थ खावेत. म्हणजे कमी तिखटाचे, पचायला हलके असे पदार्थ. ह्यामुळे काय होईल की पोटात ना जळजळ ना जडत्व. त्यामुळे एकाग्रचित्त राहण्यास मदत होईल. तसेच रोज थोडा का होईना व्यायाम जरूर करावा. दिवसातून दोनदा किमान 15 मिनिटे धावून यावे. किंवा १२ सूर्यनमस्कार सकाळी घालावेत. बाकी तुम्ही मंडळी हुशार आहातच… द्या धक्का मग परीक्षेत पेपर एकदम सोप्पा…
It’s a Final Countdown …. Tick Tick 1 Tick Tick 2
महत्वाचे म्हणजे आता कंपासबॉक्स आवश्यक गोष्टींनी भरलेली आहे ना हे पाहणे. हॉल तिकीट तपासून नीट ठेवणे. पॅड, पट्टी आन बाकी आवश्यक गोष्टी नीट एका जागी ठेवणे. नेहमीच वापरातला पेन शक्यतो सोबत असावा. कारण सवयीचा पेन असला तर बोटे दुखण्याचा त्रास कमी होतो.
परीक्षेदरम्यान कोणते कपडे घालणार आहोत ह्याचे नियोजन करून ठेवा. फार ढगळ किंवा फार टाईट कपडे घालू नका. पेपर लिहिताना कंफर्टेबल आणि सुटसुटीत बसता आले पाहिजे असं पहा.
चष्मा असल्यास तो नीट बॉक्समध्ये असेल असं पाहावे. एखादा एक्सट्रा चष्मा असेल तर तो सुद्धा नीट स्वच्छ करून वापरून पाहावा. डोळे नियमित स्वच्छ राहतील असं पाहावे आणि झोपताना गरज असल्यास नेत्रांजन वगैरे डोळ्यात घालावे.
हे वाचा: 7 एप्रिल 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…
फ्रेश रहा… आनंदी रहा. आमच्याकडून तुम्हाला भविष्यातील सर्व परीक्षांसाठी शुभेच्छा..!
प्रयत्न सोडू नका..!